शहरातील कोविड केअर सेंटर, जम्बो सेंटर, लसीकरण केंद्र, आयसीयूंचे मॅपिंग करा – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील कोविड केअर सेंटर्स, जम्बो सेंटर्स,  लसीकरण केंद्रे, आयसीयू सुविधा उपलब्ध असलेले सेंटर्स यांचे मॅपिंग करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोविडसंदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. खासगी, स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर्सची माहितीही या मॅपिंगमध्ये घेण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले.

मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱया अडीअडचणी सोडविणे आदींसंदर्भात तसेच या कामांमध्ये मुंबई महापालिका, पोलीस दल यांच्यामध्ये समन्वय वाढविण्याच्या अनुषंगाने आज मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व कामांच्या प्रगतीचीही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईमध्ये जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये लवकरच सुमारे सात हजार ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे दोन हजार आयसीयू/एचडीयू बेड्सची उपलब्धता करण्यात येत आहे. शिवाय जिथे शक्य आहे तिथे पेडिअॅट्रीक केअर सेंटरही निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. शहरात कोविड रुग्णांना उपचार साधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार थोपविण्याच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा असून सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेमार्फतही चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱयांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी, मुंबईतील महापालिका झोन्सचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी अधिकाऱयांनी दिली.

पावसाळापूर्व कामे समन्वयाने पार पाडा

मुंबईतील पावसाळापूर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू महिना महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कामगारांचे होणारे स्थलांतर याचीही माहिती घेऊन त्याअनुषंगाने पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.