हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनाही खामनदी संवर्धनाचा अभिमान वाटला असता- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझी वसुंधरा’ प्रकल्पातंर्गत खामनदी पुनरुज्जीवन आणि स्वच्छता अभियान लोक चळवळीतून राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनाही या उपक्रमाचा अभिमान वाटला असता, अशा शब्दांत या उपक्रमाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले काम खामनदीच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून केल्याबद्दल महापालिकेसह विविध संस्थाचे अभिनंदनही आदित्य ठाकरे यांनी केले. खामनदी संवर्धनाचा प्रकल्प राज्यातील शहरांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे, असेही ते म्हणाले.

‘माझी वसुंधरा’ प्रकल्पातंर्गत संभाजीनगर शहरातील खामनदी पुनरुज्जीवन कार्यक्रम आणि नदीची स्वच्छता मोहीम महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी, इकोसत्व, व्हेरॉक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. खामनदीच्या पात्राची स्वच्छता करून या ठिकाणी दोन किमीचा फुटपाथ, बालकांसाठी उद्यान, फुलपाखरू गार्डन, शंभर पथदिवे, व्हॉलीबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, आजी-आजोबा पार्क लोकसहभागातून तयार करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य, शहरप्रमुख डॉ.बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, छावणीचे विक्रम मोरे, इकोसत्वच्या गौरी नताशा, व्हेरॉकचे शेखर मांडे याच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

संभाजीनगर ‘स्मार्ट सिटी’च्या विविध उपक्रमांचे उद्घाटन

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स, जीआयएस आणि नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते बुधवारी झाले. महापालिका आयुक्त व प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पारदर्शी, जलद व कार्यक्षम सुविधा पुरवण्यासाठी स्मार्ट सिटीने ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवले आहे. महापालिकेचे सर्व कामकाज आता ई-गव्हर्नन्सच्या या माध्यमातून डिजिटल होणार आहे. नागरिकांना मोबाईल वर ऑनलाइन पद्धतीद्वारे आता या सगळ्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

जीआयएस प्रकल्पांतर्गत पूर्ण शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून 300 विविध स्तरांचा नकाशा तयार करण्यात येईल ज्याद्वारे प्रत्येक मालमत्तेचा एक युनिक जीआयएस आयडी तयार होईल. या प्रकल्पामुळे शहराचा विकास करण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. प्रत्येक मालमत्तेचे योग्य ते कर मूल्यांकन केले जाणार आहे.

ई-व्हेईकलचे उद्घाटन

स्मार्ट सिटीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलत कार्यालयासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-वेहिकल्स घेतले आहे. या तिन्ही महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या कार्यालयात आदित्य ठाकरे यांचा हस्ते करण्यात आले. यामध्ये नागरी सुविधा केंद्रांचे देखील उद्घाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे ह्यांनी स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या विविध उप्रकमांचे कौतुक केले. ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानद्वारे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करणे आता काळाची गरज आहे आणि हे प्रकल्प शहराला इतर मोठे शहरांच्या यादीत आणून देईल.