
सामना प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर जिह्याचा दोन दिवसांचा दौरा झंझावाती ठरला. जिह्यातील चंदगड, गडहिंग्लज या दुर्गम भागातील जनतेसाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा विशेष संस्मरणीय ठरला. चंदगड तालुक्यातील कानडेवाडी येथे एका वृद्ध शिवसैनिकाच्या पाया पडून आदित्य ठाकरे यांनी आशीर्वाद घेतले.
आदित्य ठाकरे यांची संवादयात्रा मंगळवार-बुधवार कोल्हापूर जिह्यात सुरू होती. या दौऱयात पहिल्या दिवशी चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. या भागातील अनेक ग्रामस्थ मुंबईत रोजीरोटीसाठी आहेत. संग्रामसिंह कुपेकर यांच्या कानडेवाडी येथील निवासस्थानीही आदित्य ठाकरे जाणार होते.
माझ्या पाया पडू नका; मी तुमच्यातलाच एक आहे
या रस्त्यावर शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या गर्दीतच एक वृद्ध शिवसैनिक उठले आणि आदित्य ठाकरे यांच्या पाया पडण्यासाठी वाकले. ज्येष्ठ नागरिक पाया पडतोय हे पाहताच ते अस्वस्थ झाले. त्यांनी शिवसैनिकाच्या खांद्याला धरून उठविले आणि स्वतः त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या ज्येष्ठ शिवसैनिकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. हे दृश्य पाहून सारेच अवाक झाले. त्यानंतर भाषणातही आदित्य ठाकरे यांनी हाच धागा पकडला. ‘माझ्या पाया पडू नका; मी तुमच्यातलाच एक आहे. यापुढे असे करू नका’ असे आवाहन त्यांनी केले. आदित्य ठाकरे पुढील दौऱयाला गेल्यानंतर आजही कानडेवाडी परिसरात त्याचीच चर्चा सुरू आहे.
पायऱ्यांवर बसून केलेल्या संवादाची जोरदार चर्चा
दोन दिवसांच्या दौऱयात आदित्य ठाकरे यांच्या साधेपणाचे आणि सहज संवाद साधण्याच्या कौशल्याचे दर्शन अनेकदा घडले. बेळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर पहिला कार्यक्रम चंदगड तालुक्यातील शिणोली येथे केदारी रेडेकर फाऊंडेशनचा होता. तरुणाईने या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती. भव्य व्यासपीठ उभारले होते. आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर थेट माईक हातात घेतला आणि व्यासपीठावर जाण्यासाठी ज्या पायऱया लावण्यात आल्या होत्या त्यावरच बसून त्यांनी युवकांशी संवाद साधला.



























































