आगीपासून लोकांना वाचवणाऱ्या छोट्या झेनचे आदित्य ठाकरेंकडून कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील हिंदमाता परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर परिस्थितीत मोठ्या माणसांचेही हातपाय गळून जातात. अशा स्थितीत १० वर्षांच्या झेनने प्रसंगावधान राखत अनेकांना दिलासा दिला आणि देवदूत बनत त्यांचे प्राणही वाचवले. १० वर्षांच्या झेन सदावर्तेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. झेनने १४ लोकांचे प्राण वाचवले असून ती खरी हिरो आहे अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी तिचे कौतुक करण्यासाठी ट्विट लिहले आहे.

क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आग लागली असून ती झपाटय़ाने रौद्ररूप धारण करत असल्याचे कळताच इमारतीमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. तेव्हा सोळाव्या मजल्यावर राहणारी झेन सदावर्ते हिने कणखर भूमिका घेतली. तिने ओरडून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. ‘घाबरू नका, काही होत नाही. तसेच लिफ्टमध्ये जाऊ नका’ असे सांगत ती सर्वांना 1605 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. सर्वांना खाली बसायला लावून कॉटनचा कपडा पाण्यात बुडवून नाकावर धरण्यास सांगितले. त्याचवेळी काहींना खिडकीबाहेर कपडे फडकवून नागरिकांचे लक्ष वेधण्यास सांगितले. यावेळी तिने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून आगीची माहिती दिली. झेनने दिलेला आत्मविश्वास आणि दाखवलेला बिनधास्तपणा अखेर सार्थकी लागला. सहावीची विद्यार्थिनी असलेली झेन सदावर्ते आज अनेकांसाठी देवदूत ठरली असे इमारतीमधील नागरिकांनी सांगितले. ‘तिसरीत असताना शाळेत डिझास्टर मॅनेजमेंट शिकवले होते. त्यानुसार मी सर्वांना सूचना करून परिस्थितीला सामोरे जाण्यास सांगत होते. त्याचा अखेर फायदा झाला’ असे झेन म्हणाली.