राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. मात्र, या स्फोटाबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल सरकारला केला आहे.

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा सीएनजी स्फोट होता की आणखी काही याबद्दल स्पष्टता नाही. देशाच्या राजधानीतील लाल किल्ला परिसर सुरक्षित नाही, तर मग देशाच्या सुरक्षिततेचे काय? असा सवालही त्यांनी केला आहे. स्फोटाची घटना घडली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा बिहारच्या निवडणुकीत गुंतले होते. त्यानंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावरही जाऊन आले आहेत.

दिल्लीतील स्फोटाला दोन दिवस झाले असले तरी ती घटना बॉम्बस्फोट होती, सीएनजी स्फोट होता की आणखी काही, याबाबत गृहमंत्रालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत काहीच स्पष्टता नाही. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अद्याप कोणतीही माहिती देण्यात येत नाही. देशाच्या राजधानीतच अशी घटना घडते, राजधानीच सुरक्षित नसेल तर देशात आज कोण सुरक्षित आहे? असा प्रश्नही त्यांनी केला. देशातील गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांची स्थिती काय आहे? ते नेमके काय करत आहेत? या घटनेची माहिती त्यांना कशी मिळाली नाही? असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. सरकारने हाय अलर्ट जारी केले आहे. मात्र, याबाबत योग्य ती माहिती देत स्पष्टीकरण करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.