India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे

संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते X वर एक पोस्ट करत असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “सीमावर्ती राज्यं, जिल्हे, गावं आणि तिथल्या नागरिकांना त्यांच्या धैर्य, शौर्य आणि सामर्थ्यासाठी मानाचा मुजरा. गेल्या काही दिवसांत त्यांनी जे अनुभवलंय, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यासोबतच युद्धसदृश परिस्थितीतही आपल्या नागरी सेवा अबाधित राहाव्यात यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रशासनिक सेवांनाही सलाम.”

दरम्यान, हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे, अशी माहिती हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात माहिती देताना विक्रम मिस्री म्हणाले आहेत की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिस्री म्हणाले.