
भाजपचा पुन्हा रात्रीस खेळ चालू असून कुर्ला ‘आयटीआय’मध्ये स्विमिंग पूल बांधण्यासाठी या ठिकाणची तब्बल नऊ हजार झाडांची मध्यरात्री कत्तल केली जाणार आहे. ही झाडे तोडण्यासाठी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्रही दिले आहे. या संतापजनक प्रकाराची पोलखोल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून केली आहे.
मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून ‘मियावकी’ पद्धतीची झपाटय़ाने वाढणारी वने निर्माण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे 50 ठिकाणी अशी वने उभारण्यात आली असून यामध्ये तब्बल 50 हून अधिक प्रकारची हिंदुस्थानी प्रजातीची झाडे वाढवण्यात आली आहे. यामध्ये कुर्ला आयटीआयच्या जागेमध्येही अशाच प्रकारे मियावकी वन तयार करण्यात आले आहे. मात्र स्विमिंग पूल बांधण्याच्या नावाखाली ही नऊ हजार झाडे तोडण्याचे नियोजित आहे.
‘आरे’सारखाच प्रकार
आरे मेट्रो कारशेडसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यास शिवसेनेसह पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. मात्र फडणवीस सरकारच्या निर्देशाने नागरिकांना अंधारात ठेवून रातोरात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. यानंतर प्रचंड मोठे आंदोलन करण्यात आले होते.
शिवसेनेने डाव उधळला
या ठिकाणची झाडे तोडण्यासाठी सोमवारी रात्री काही कामगार जेसीबीसह आले. त्यांनी संरक्षक भिंत तोडण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच शिवसेनेचे विधानसभाप्रमुख मनीष मोरजकर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला.
गेल्या वर्षी ‘एचपीसीएल’ सीएसआर फंडाच्या माध्यमातून या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र आता भाजपच्या मंत्र्याकडून रातोरात ही नऊ हजार झाडे तोडण्याचे नियोजन मुंबईच्या पर्यावरणाला धोका निर्माण करणारे आहे. याचे दुष्परिणाम मुंबईला भोगावे लागतील. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते