
मुंबईचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे श्रेय लाटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी अक्षरशः उघडे पाडले. कोस्टल रोडच्या जमीन सर्वेक्षणापासून 2016 मध्ये झालेले भूमिपूजन, विविध कामांच्या शुभारंभाचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमधील फोटोच त्यांनी भव्य स्क्रिनवर झळकवले. या कुठल्याही फोटोत फडणवीस नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गद्दारीने आमचे सरकार पाडल्यावर उद्घाटनाचे श्रेय घेणाऱया सत्ताधाऱयांचा त्यांनी समाचार घेतला.
आपले काका राज ठाकरे यांची ‘लिबर्टी’ घेत ‘लाव रे फोटो’ म्हणत असल्याचे सांगत त्यांनी कोस्टल रोडच्या शिवसेनेने केलेल्या कामांचे फोटो दाखवले. पालिकेत 1997 मध्ये शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आम्ही 600 कोटी तुटीत असणाऱया पालिकेच्या ठेवी 25 वर्षांत 92 हजार कोटींवर नेल्या. या ठेवी मुंबईकरांच्या सेवेसाठी वापरल्या जात आहेत. जगात कुठेही नसेल अशी आरोग्य यंत्रणा उभी केली. 1235 शाळांमध्ये आठ माध्यमांतून शिक्षण दिले जात आहे. तसेच आयजीसीएससी, आयबी, सीबीएसई, आयसीएससी असे बोर्ड आणले. टॅबमध्ये अभ्यास दिल्याने दप्तराचे ओझे कमी झाले. विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवास, माफक दरात बेस्टची सेवा दिली. कोस्टल रोड केला, एसटीपी प्रकल्पासाठी 18 हजार कोटींची तरतूद केली. कोरोना काळातील आमच्या कामाचे कौतुक जगाने केले. ही कामे आम्ही करून दाखवल्याचेही ते म्हणाले. आपण केलेली कामे आणि जाहीरनाम्यात दिलेल्या वचननाम्यांच्या पूर्ततेवर जिंकत आहोत. मात्र सत्ताधारी भाजपच्या हार्ंडगवर केवळ दोनच चेहरे दिसत आहेत. एक पंतप्रधानांचा आणि दुसरा मुख्यमंत्र्यांचा. त्यांनी या मुंबईसाठी काय केले ते जाहीर करावे, असे आव्हानच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
दिल्लीचे तख्त हलवूया!
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही गटर, मीटर आणि वॉटर आणि नागरी सुविधांसाठीची आहे. त्यामुळे आपण सत्ताधाऱयांची दिशाभूल करणारी आश्वासने आणि जातीधर्मातील वादात पडू नका. ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आहेच आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वादही आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद आणि पवारांच्या आशीर्वादाने दिल्लीचे तख्त हलवूया, अशी एकीची साद शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज घातली.
भाजपची विचारसरणी महाराष्ट्रविरोधी
मुंबईत होणारी गिफ्ट सिटी पळवली, उद्योगधंदे गुजरातला पळवले. खासगीकरणामुळे ‘बेस्ट’ संपवली. त्यांना तुम्ही मतदान करणार का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तुम्ही 15 जानेवारीला जो निर्णय घेणार तो मुंबईचा निर्णय असेल, 29 शहरांसाठीचा निर्णय असेल, महाराष्ट्रासाठीचा निर्णय असेल त्यामुळे योग्य निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपची विचारसरणी महाराष्ट्रविरोधी आहे. त्यामुळेच आपल्या मतदारसंघात डिपॉझिट जप्त होणाऱया अण्णामलाईची मुंबई आमची नसल्याचे बोलण्याची हिंमत होते, असा टोलाही त्यांनी हाणला.



























































