चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील केंद्रातील भाजप सरकारवर जीएसटी (GST) धोरणाबाबत जोरदार टीका केली आहे. “केंद्र सरकारने चुकीचा निर्णय दुरुस्त केला आहे आणि भाजप माफी मागण्याऐवजी जीएसटी सुधारणांना भेट म्हणून सादर करत आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.

X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, “केंद्र सरकारने जीएसटीची चुकीची पद्धत लागू केली. आता याची दुरुस्ती केल्यानंतर सरकार कोट्यवधी रुपये खर्चून ही नागरिकांसाठी भेट असल्याचं म्हणत याची जाहिरात करत आहे. चूक दुरुस्त केल्यानंतर त्यासाठी माफी मागितली जात नाही, उलट गर्विष्ठपणे त्याला भेट म्हणून सादर केलं जात आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे.”

ते पुढे म्हणाले, “ही सुधारणा नाही, तर चुकीचा निर्णय आणि खराब प्रशासन यांचा छोटासा दुरुस्तीचा प्रयत्न आहे, तोही माफीशिवाय! आता तरी केंद्र सरकारने राजकीय भेदभाव न करता राज्यांना त्यांचा हक्क वेळेवर द्यावा, अशी अपेक्षा आहे.” आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणातील त्रुटी आणि राज्यांना निधी वाटपात होणाऱ्या भेदभावावर बोट ठेवण्यात आलं आहे.