न्यायाला मुद्दाम उशीर करणे हा महाराष्ट्रावर अन्याय, आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घटनाबाह्य सरकारला संरक्षण देण्यासाठीच विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रता सुनावणीत वेळकाढूपणा होत असल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा आपण करतो, त्यामुळे घटनाबाह्य सरकारचे अशा प्रकारे समर्थन केले जाते हे पाहणे खेदजनक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. न्यायाला मुद्दाम उशीर करणे हा अन्याय आहे. न्याय नाकारण्यासारखे आहे. हा फक्त आमच्यावर नाही तर महाराष्ट्रावर अन्याय आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून घटनाबाह्य सरकार स्थापन करणाऱया भाजपने महाराष्ट्राला अन्यायकारक वागणूक दिली. आता चेंडू सभापती राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. मात्र तिथे असे दिसते की, घटनाबाह्य सरकारचे संरक्षण करण्यासाठी सभापती वेळकाढूपणा करत आपल्या क्षमतेच्या आणि चौकटीच्या पलीकडे जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जगात देशाची बदनामी होतेय

विधानसभा अध्यक्ष लवकरच घाना येथील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत. परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे सरकारच घटनाबाह्य आहे आणि बेकायदेशीर मार्गानी संरक्षित आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

अध्यक्षांनी परदेश दौरा करणे चुकीचे

माननीय सर्वेच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये आदेश दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष लवकर न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे. ‘अपात्रता सुनावणीबाबतचे प्रकरण एका पक्षाबद्दल नाही, तर महाराष्ट्राविषयी आहे. तसेच राज्यातील जनतेबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे. यावर महत्त्वाचा निर्णय होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी संसदीय परिषदेसाठी परदेश दौरा करणे चुकीचे, ठरेल. त्यांची ही वेळकाढू रणनीती म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना संरक्षण देण्यासारखी आहे. महाराष्ट्र पाहत आहे. भारत पाहत आहे. जग पाहत आहे.’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.