
मुंबईतील वरळी येथे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजच हे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यानुसार विनाविलंब या कामास सुरूवात झाली असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्वतः भेट देत या कामाची पाहणी केली.
आदित्य ठाकरे यांनी येथील तंत्रज्ञांसोबत पुढील कामासंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर येथे उभारलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुनर्विकास आराखड्याची संपूर्ण माहिती घेतली. हा प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



























































