एनएससीआय’ची क्षमता आता 650 बेड, अतिदक्षता कोरोना वॉर्ड लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वरळीतील एनएससीआय क्रीडा संकुलात आता आयसोलेशनसाठी आणखी 150 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या एनएससीआयच्या आयसोलेशनची क्षमता वाढून ६५० झाली आहे. त्याचबरोबर 40 खाटांची अतिरिक्त क्षमता असणारा कोरोना अतिदक्षता कक्ष (Corona ICU) देखील या ठिकाणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एनएससीआय’, रेसकोर्स, ‘बीकेसी’मध्ये उभारण्यात येत असलेल्या नव्या सुविधांची पाहणी केली.

nsci-center-aditya

मुंबईसह वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी वरळीमध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (एनएससीआय) भव्य स्टेडियमवर ५०० खाटांचे ‘कोविड केअर सेन्टर’ सुरू करण्यात आले. जी दक्षिण विभागाने मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष तयार केला आहे. येथे रुग्णांच्या संपर्कात न येता डॉक्टरांमार्फत होणार्‍या प्रभावी उपचार पद्धतीचे कौतुक केंद्रातून आलेल्या विशेष पथकानेही केले आहे. एनएससीआयमधून आतापर्यंत शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून एनएससीआयमध्ये आणखी १५० बेडची व्यवस्था आज पूर्ण करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रकृती गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांसाठी ४० बेडचा विशेष कक्षही लवकरच उभारला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एनएससीआय’, रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’ मैदानामध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना कक्षाची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

रेसकोर्समधील कोरोना सेंटर अंतिम टप्प्यात
एनएससीआयजवळ असणाऱ्या ‘रेस कोर्स’ परिसरातदेखील कोरोना आयसोलेशन केंद्र -२ उभारण्यात येत आहे. या केंद्रात ३०० कोरोना रुग्णांवर उपचार करता येणार असून हे काम
आता अंतिम टप्प्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मान्यवरांनी ‘रेस कोर्स’ परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. ही कामे आता अंतिम टप्प्यात असून लवकरच हे केंद्रदेखील सुरू होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

‘बीकेसी’त १ हजार बेडचा वॉर्ड
मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण ‘बीकेसी’त तब्बल एक हजार बेड्सच्या क्षमतेचा कोरोना वॉर्ड उभारण्यात येत आहे. ‘बीकेसी’त उभारल्या जाणार्‍या वॉर्डची क्षमता पाच हजारांपर्यंत वाढवता येणार आहे. तशी व्यवस्था हा कक्ष उभारताना करण्यात येत आहे. यात ५०० बेडवर ऑक्सिजन उपलब्ध असतील. वरळी परिसरातील विलगीकरण केंद्रांच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री, महापालिका आयुक्तांनी वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील मैदानात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) उभारण्यात येत असलेल्या या वॉर्डचीही पाहणी केली.