
सामना ऑनलाईन । अजमेर
शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी अजमेरमधील तीर्थनगरी पुष्करमध्ये जगत्पिता ब्रह्माचे दर्शन घेतले. यानंतर येथील पवित्र ख्वाजा साहब दर्ग्यामध्ये जाऊन त्यांनी मनोभावे प्रार्थनाही केली. देशात सुख-शांतता नांदू दे, असे साकडेही आदित्य यांनी यावेळी घातले.
आदित्य ठाकरे आज पुण्यनगरी अजमेर दौऱयावर होते. सकाळी त्यांनी जगप्रसिद्ध ब्रह्माचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी अजमेर दर्ग्याला भेट देऊन पुष्पमाला आणि मखमली चादर श्रद्धापूर्वक अर्पण केली. अजमेर दर्ग्यातील खादीम सैयद आदिल चिश्ती यांनी आदित्य यांच्या हातात पवित्र बंधन बांधले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दर्गा प्रशासनाच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा खास सत्कार करण्यात आला आणि सन्मानचिन्ह व प्रतिमा भेट देण्यात आली.
अजमेरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त
आदित्य ठाकरे अजमेरमध्ये येत असल्यामुळे मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून उत्स्फूर्तपणे स्वागत करणाऱया नागरिक-भाविकांना अभिवादन केले. या दौऱयासाठी स्थानिक प्रशासनाने दर्ग्यासह संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिकही उपस्थित होते.

























































