आम्हाला हरवण्यासाठी भाजप बाहेरून फौजफाटा आणत आहे; केजरीवाल यांचा आरोप

472
arvind-kejriwal-punjab

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहचला आहे. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीमध्ये आमच्याशी मुकाबला करण्यासाठी भाजपला कोणीही मिळाले नाही. त्यामुळे आता आम्हाला हरवण्यासाठी भाजप आता बाहेरून फौजफाटा आणत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. भाजपवाले बाहेरच्या राज्यातील आमदार, खासदार आणून आमच्याविरोधात प्रचार करत आहेत. ते दिल्लीच्या मुलाला केजरीवालला हरवण्यासाठी आले आहे. मात्र, दिल्लीतील जनता त्यांचे मनसुबे उधळून लावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील गोकुलपूरमध्ये झालेल्या एका सभेत ते बोलत होते.

काँग्रेस, भाजप, राजद कोठून कोठून हे पक्ष दिल्लीत आम्हाला पराभूत करण्यासाठी येत आहेत. भाजपवाले अनेक आरोप करतील, शाळांचा दर्जा खालावतो आहे, क्लिनिकची सुविधा नाही, असे अनेक आरोप आमच्यावर होतील, त्यांना चहा पाजून तुम्ही परत पाठवा, असे आवाहन कजेरीवाल यांनी जनतेला केले. ते प्रचारासाठी आल्यावर त्यांना विचारा, तुम्ही कोणत्या राज्यातून आला आहात, तुम्हाला दिल्लीबाबत काय माहिती आहे, तुमच्या राज्यात किती तास वीजपुरवठा होतो, दिल्लीत 24 तास वीजपुरवठा होत असून वीज मोफत असल्याची माहितीही त्यांना द्या. आपल्या राज्यातील मोहल्ला क्लिनिक त्यांना दाखवा. चहा प्या आणि तुमच्या राज्यात परत जा, असे त्यांना ठणकावून सांगा. दिल्लीतील जनता अपमान सहन करणार नाही. दिल्लीतील जनतेला सल्ल्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला राज्यातील शाळांचा दर्जा उंचावायचा असून जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्यसेवा द्यायच्या आहेत, हे आमचे ध्येय आहे. मात्र, इतर राज्यातून आलेल्या फौजफाट्याला फक्त आम्हाला पराभूत करायचे आहे. आमची जनता त्यांचे मनसुबे उधळून लावेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या