आवरे-पनवेल एसटीचा गव्हाणफाटा येथे अपघात; 21 प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आवरे- पनवेल एसटीचा (एमएच-20 बीएल-0997) गव्हाणफाट्याजवळ अपघात झाला. सुदैवाने ही बस एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. मात्र या अपघातात 21 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे समजल्यानंतर इतर वाहनातील प्रवाशांनी या बसमधील जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढले व जखमींना ताबडतोब रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम आणि पनवेल येथे रूग्णालयात दाखल केले. कळंबोली येथील रूग्णालयात 17 तर पनवेल येथे 4 जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. या बसमधून कॉलेजचे विद्यार्थी आणि रूग्णालयात उपचारासाठी जाणारे प्रवासी जास्त संख्येने होते.

आवरे गावातून ही बस पनवेल आगाराकडे जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये 40-45 प्रवासी प्रवास करत होते. गव्हाणफाट्याच्या पुढे उतरणीवर गेल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस एका आंब्याच्या झाडाला धडकली. या धडकेमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्याला व डोक्याला जबर मार बसला. बसमधील 21 प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम आणि पनवेल येथे दाखल करण्यात आले होते. काही प्रवाशी खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. एमजीएम कळंबोली रूग्णालयात शितल गोंधळी (18), मनिषा घोलप (60), प्रशांत ल म्हात्रे (40), साक्षी रेवसकर (16), रितेश कांबळे (19), सोनम कांबळे (22), जयवंत म्हात्रे (67), अनुसया म्हात्रे (65), प्रविण म्हात्रे(41), रघुनाथ नागावकर(60), कमलाकर कोळी(66), दत्तात्रेय डाकी(58), राजाराम पाटील (54), उषा म्हात्रे(59), सुधिल म्हात्रे (34), स्वानंद नवाळे(28) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे चालक एस.एम. कोलाटे याचे म्हणणे आहे. मात्र पनवेल पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत. एसटी महामंडळाकडून जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 1 हजार रूपये देण्यात आले असल्याची माहीती स्थानक प्रमुख डी.के. म्हात्रे यांनी सांगितले. तसेच ज्या प्रवाशांना जास्त खर्च आला असेल त्यांना देखील नंतर मदत देण्यात येईल असे सांगितले.