द्रविडला बाहेर काढलंय! डिव्हिलियर्सचा राजस्थान रॉयल्सवर बॉम्ब

राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर राहुल द्रविडबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या, मात्र तेव्हाच दक्षिण आफ्रिकन दिग्गज अ‍ॅबी डिव्हिलियर्सने द्रविडला बाहेर काढण्याचा डाव राजस्थान रॉयल्सने साधल्याचा बॉम्ब फोडला. त्याला बढती देण्याच्या नावाखाली संघाच्या धोरणात्मक गोष्टींपासून दूर ठेवण्याचे राजस्थान रॉयल्सने डावपेच आखल्याचा आरोपही डिव्हिलियर्सने करत हे प्रकरण आणखी तापवले आहे.

द्रविडच्या राजीनाम्यानंतर फ्रेंचायझीने सारवासारव करताना जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की आम्ही द्रविडला मोठी भूमिका देण्याची ऑफर होती. पण प्रत्यक्षात बढती देण्याच्या नावाखाली द्रविडला प्रवाहाच्या बाहेर काढण्याचा डाव होता. हे द्रविडच्या लक्षात आले आणि त्याने राजस्थान रॉयल्सची ऑफर नाकारली.

डिव्हिलियर्सची राजस्थानवर तोफ

आपल्या यूट्यूब चॅनलवर डिव्हिलियर्स म्हणाला, ‘माझ्या नजरेत द्रविडला जबरदस्तीने बाहेर करण्यात आलंय. हे त्याचं स्वतःचं पाऊल वाटत नाही. इतक्या प्रामाणिक व पारदर्शक व्यक्तीला अशा पद्धतीनं बाहेर करणं चुकीचं आहे.’

द्रविडचा निराशाजनक हंगाम

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी अत्यंत दयनीय झाली होती. 14 पैकी केवळ 4 सामनेच त्यांना जिंकता आले होते. कर्णधार संजू सॅमसन जखमी होता, त्याला फक्त 9 सामनेच खेळता आले. त्याच्या अनुपस्थितीत रियान परागकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं, पण टीमचं नशीब बदललं नाही. आता नियमित कर्णधार संजू सॅमसनसुद्धा लवकरच राजस्थान सोडणार आहे. त्यामुळे रियान पराग पुढचा कर्णधार होऊ शकतो, पण द्रविड यावर समाधानी नव्हता. त्याचा विश्वास यशस्वी जैसवाल किंवा ध्रुव जुरेलसारख्या खेळाडूंवर होता. स्थिरता आणि कामगिरीवर भर देणारा द्रविड अस्थिर परागला जबाबदारी देण्याच्या विरोधात होता. हेच कारण द्रविडच्या राजीनाम्याचे खरे कारण मानले जात आहे.