पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चक्रम कारभाराची चुणूक दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आली. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठक ठेवण्यात आली. मात्र सत्तार तब्बल साडेचार तास उशिराने बैठकीला पोहोचले. तोपर्यंत सत्तारांची र्वींट बघून बरेचसे अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. समोर मोजकेच कर्मचारी असल्याचे पाहून सत्तारांची टोपी फिरली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला गैरहजर असलेल्यांना नोटिसा बजावण्याचे फर्मान सोडले. सत्तारांच्या या अजब कारभारामुळे प्रशासनामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याला तुफान पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील तब्बल सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेला असताना पालकमंत्री अब्दुल सत्तार हे गायब होते. सोमवारी अचानक ते उगवले.
नोटिसा काढणार
सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर परिस्थिती आणि पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला काही अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते. पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले.
बैठकीला येताच पारा चढला...
अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र रात्रीचे नऊ वाजून गेले तरी सत्तारांचा पत्ता नसल्याने हळूहळू अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घर जवळ केले. साडेनऊ वाजता सत्तारांचे आगमन झाले. बैठकीला तुरळक उपस्थिती पाहून सत्तार नवे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यावरच उखडले. बैठकीला गैरहजर असणाऱ्यांना नोटिसा बजावा, असा फतवाच सत्तारांनी काढला. ‘एकतर सत्तार स्वतःच साडेचार तास उशिरा आले आणि नोटिसा आम्हाला’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये उमटली आहे.