
सामना ऑनलाईन, मुंबई
क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी या इमारतीचा बिल्डर अब्दुल सुपारीवाला याला अटक करण्यात आली आहे. विनोद मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे.
‘क्रिस्टल’ इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र ही यंत्रणा बंद असल्यामुळे आग आणखी भडकल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. यामुळे अग्निशमन दलाकडून दाखल तक्रारीवरून अब्दुल रझाक इस्माइल सुपारीवाला बिल्डरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे.
‘क्रिस्टल’ इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माइल सुपारीवाला याच्या बेजबाबदारपणामुळेच रहिवासी या इमारतीत राहत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. याबाबत न्यायालयात खटला सुरू असला तरी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी इमारत रिकामी करून वीज-पाणी कापण्यात आले आहे. परिणामी 58 कुटुंबे ऐन पावसाळय़ात उघडय़ावर आली आहेत. बिल्डरने पालिकेकडे प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्यानेच इमारतीची ‘ओसी’ मिळण्यास दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे, तर राहण्यास दुसरी जागा नसल्याने आपण इथे नाइलाजाने राहत असल्याचे रहिवासी सांगत आहेत.





























































