>> सुरेश चव्हाण
पुण्याच्या सिंहगड रोडवरील माणिक बाग भागातील नॅशनल पार्क सोसायटीमधील ‘स्वप्निल’ या इमारतीत डॉ. अपर्णा देशमुख यांचा ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम नावाप्रमाणेच आजी-आजोबांना माया देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. अपर्णा व तेथील आजी-आजोबांचे हसरे-आनंदी-टवटवीत चेहरे पाहिल्यावर तो वृद्धाश्रम न वाटता, एखादे कुटुंबच एकत्र राहत असल्यासारखे वाटते. यापाठीमागे दडला आहे अपर्णा यांचा त्या आजी-आजोबांप्रती असलेला निखळ स्नेहबंध.
अपर्णा या तरुणीने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वृद्धसेवेचे हे स्वप्न पाहिले व तसे काम हाती घेतले. ती हे कार्य गेले एक तप करत आहे. तिने वैद्यकीय शिक्षण जळगावात पूर्ण केले. त्यानंतर तिने शस्त्रािढया या तिच्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पुण्यात येऊन घेतले. त्यासाठी तिने खासगी रुग्णालयात नोकरी केली.
वृद्धाश्रम काढण्याची गरज अपर्णाला तिच्या जीवनात आकस्मिक घडलेल्या एका घटनेमुळे वाटली. त्या घटनेमुळे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. घडले असे, की एका आजीला आजारी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. तिचे पाय फ्रॅक्चर झाले होते. अपर्णा यांनी ते पाहिले व त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी त्या आजीला घरी आणून तिची शुश्रूषा केली. त्या एका घटनेने अपर्णा देशमुख यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांनी एक फ्लॅट निराधार आजी-आजोबांसाठी भाडय़ाने घेतला आणि कामाला सुरुवात केली. घरच्याच माणसांनी रस्त्यावर टाकून दिलेले गोरगरीब वृद्ध रुग्ण शोधून त्यांना आधार देणे, हे त्यांनी त्यांचे जीवनकार्य ठरवले. रुग्ण वाढले, तेव्हा त्यांनी एका इमारतीत भाडय़ाने जागा घेतली व या आश्रमास नाव ठेवले ‘आभाळमाया’!
त्यासाठी लागणारा खर्च त्या शस्त्रािढयादी वैद्यकीय सेवा करून मिळवलेल्या पैशातून चालवतात. त्या पुण्यात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ‘जनरल सर्जरी’ करतात. त्यांनी वृद्धसेवेचे काम करण्यासाठी अविवाहित राहण्याचे ठरवले आहे. त्यांच्या वडिलांचा, डॉ. अनिल देशमुख यांचा अपर्णा यांना या कामासाठी पूर्ण पाठिंबा असून या कामात त्यांचाही सहभाग असतो. शिवाय काही दानशूर मंडळीही या कामासाठी मदत करतात.
आश्रमात निराधार, अंथरुणाला खिळलेले, मानसिक आजाराने त्रस्त, मतिमंद, दिव्यांग; तसेच, लग्न न झालेले, पक्षाघात झालेले वृद्ध व मध्यमवयीन सत्तर स्त्राr-पुरुष आहेत. परित्यक्ता स्त्रियादेखील आहेत. त्यांची काळजी घेतली जाईल अशा सर्व सोयी तिथे उपलब्ध आहेत. अपर्णा स्वत: त्यांच्यावर गरजेनुसार मोफत शस्त्रािढया करतात. त्यांचा औषधोपचार करतात. त्यासाठी अपर्णा कधी कधी दिवसाचे अठरा-अठरा तासही काम करतात.
अपर्णा यांना आश्रमातील प्रत्येकाला सर्वकाही मोफत देणे शक्य होत नाही. काहीजणांना पेन्शन मिळते. काहींचे पालक पैसे भरू शकतात. अशांकडून त्या महिना सहा हजार रुपये घेतात. अपर्णा स्वत: आश्रमातील सत्तर जणांपैकी तीस निराधार रुग्णांचा खर्च करतात. आश्रमाची तीन मजली इमारत जिचे महिना भाडे दोन लाख चाळीस हजार रुपये एवढे आहे. यासाठी इतके पैसे उभे करताना अडचणी तर येणारच.
अपर्णा यांना बारा वर्षांच्या कामात आलेले अनुभव विदारक, अस्वस्थ करणारे आहेत. आई-वडिलांना आश्रमात सोडणारी त्यांच्या पोटची मुले परत त्यांना तोंडही दाखवत नाहीत. स्वत:चा मोबाइल नंबर बदलतात, घरचा खोटा पत्ता देतात, मानसिक आजार असलेल्या, विस्मरण झालेल्या आईबद्दल ‘ती आमच्या घरातील मोलकरीण आहे’ असेही सांगण्यास कमी करत नाहीत. तर काही नातेवाईक त्यांच्या रुग्णाला आश्रमाच्या बाहेर आणून सोडतात, कारण इथे मोफत उपचार होतात, असा त्याचा समज झाला आहे. हे अनुभव दुःखदायकच आहेत.
अपर्णा म्हणाल्या की, “मी जर लग्न केले तर माझा जोडीदार माझ्याच विचारांचा मिळेल याची खात्री देता येत नाही. मुले वगैरे झाल्यावर आता मी जेवढे काम करते, तेवढे काम करू शकेन, पैसा मिळवू शकेन हे सांगता येत नाही आणि मी येथे एकटी नाहीच आहे, हे सगळे आजी-आजोबा हे माझे कुटुंबच आहे. त्यांची सुख-दु:खे ही माझीच आहेत. मी त्यांना माझ्या आई-वडिलांप्रमाणे, आजी-आजोबांप्रमाणे मानते.”
या तीन मजली इमारतीत विविध आजारांनी अंथरुणाला खिळलेले, मानसिक आजार असलेले, पक्षाघाताने त्रस्त अशांची काळजी घेण्यासाठी तज्ञ परिचारिका आहेत. काही रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास डा. अपर्णा त्या स्वत: करतात. सगळ्या गोष्टींवर त्यांचे जातीने लक्ष असते. त्यांच्या कार्यातील सहकारी डॉ. आरती गोलेचा यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्या दोघी मिळून ‘सिल्व्हर’ नावाचे हॉस्पिटल चालवतात.
राहुल पाठक व इतर कर्मचारी असा ‘आभाळमाया’त ‘स्टाफ’ आहे. हे सर्वजण आपुलकीने तेथील लोकांची देखभाल करतात. सगळे वृद्ध निवासी दररोज संध्याकाळी तळमजल्यावरील मोकळ्या जागेत एकत्र जमतात, गप्पागोष्टी, एकमेकांची चौकशी अशी देवाणघेवाण करतात. भजन, कीर्तन, गाणी, वृद्धांचा स्नेहमेळावा, त्यांचे वाढदिवस, सण, उत्सव असे कार्पाम संध्याकाळच्या मेळाव्यात साजरे केले जातात. सांस्कृतिक कार्पामांचे आयोजनही अधूनमधून केले जाते. वाचण्यासाठी वर्तमानपत्रे-मासिके-पुस्तके तेथे आहेत. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणेही कधी कधी होत असते.
‘आभाळमाया’ वृद्धाश्रमासाठी स्वत:ची इमारत असावी, म्हणून डॉ. अपर्णा यांचे प्रयत्न चालू आहेत. अद्याप सरकारी मदत मिळाली नाही. त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘मदर तेरेसा’, ‘राष्ट्रीय एकात्मता’, ‘धन्वंतरी’ असे काही पुरस्कार मिळाले आहेत. सध्याची समाजव्यवस्था पाहता घरातील वृद्ध व आजारी आई-वडिलांची काळजी घेणाऱया वृद्धाश्रमांची गरज लागणारच आहे. “आयुष्याच्या संध्याकाळी व्यक्तीचा स्वत:वर ताबा नसतो, तेव्हा त्यांना सुरक्षित हातांमध्ये सोपवणे महत्त्वाचे असते. मुलांच्या भविष्यासाठी पालक त्यांना दूरगावी हॉस्टेलमध्ये ठेवतात. तुमच्या आजी-आजोबांचे घरी हाल होत असतील तर वृद्धाश्रमास संस्कृतिबाह्य समजू नये.” असे परखड विचार डॉ. अपर्णा यांचे आहेत.