निसर्गमैत्र – बारतोंडी दुर्मीळ होतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

एकेकाळी देशात सर्वत्र आढळणारा बारतोंडी हा वृक्ष सध्या दुर्मीळ झाला आहे. उष्ण प्रदेशात हा वृक्ष वरदान आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. बोरतोंडीची पाने, फुलेच काय, पण मुळेसुद्धा उपयुक्त आहेत. बारतोंडी हा देशी वृक्ष असून त्याचे शास्त्राrय नाव ‘मोरिंडा पुबे सेन्स’ आहे, तर इंग्रजीमध्ये ‘इंडियन मलबेरी’ हे नाव आहे. औषधीदृष्टय़ा अनेकविध आजारांवर याचा उपयोग होतो.

तामीळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व गुजरात राज्यांतील कोरडय़ा वनांत बारतोंडी वृक्ष आढळतात. सध्या बारतोंडी खूपच दुर्मीळ होत चालला आहे. याच्या विविध प्रकारच्या 80 जाती असून देशात केवळ आठ जातीच आढळून येतात. उंच आणि सरळ खोड हे याचे वैशिष्टय़ आहे. वृक्षाची साल पिवळट पांढरी व गुळगुळीत असून पाने मोठी, समोरासमोर,  लहान देठाची, चकचकीत, भडक हिरवी, दीर्घवर्तुळाकृती आणि उपपर्णे रुंद व अर्धगोलाकृती असतात. लहान, पांढरी, सुवासिक फुले मे-जूनमध्ये येतात.

या वृक्षाची फळे अनियमित गोलसर असून त्यावर दहा ते बारा षटकोनी भाग असतात. प्रत्येक फळ हे संयुक्त फळ असून ते दहा ते बारा फळांच्या समूहाने बनलेले असते. फळावर तितके भाग स्पष्टपणे दिसतात म्हणूनच या वृक्षास मराठीत ‘बारतोंडी’ असे नाव आहे. याशिवाय ‘आसेती’, ‘आजल’, ‘धौला’ ही इतर मराठी नावे आहेत. याच्या मुळापासून तांबडा रंग तर सालीपासून लाल रंग तयार केला जात होता. जनावरांना यांचा पाला खाऊ घालतात तसेच रेशीम किडय़ांना ही पाने खाद्य म्हणून देतात.

लाकूड पिंगट पिवळसर व मध्यम प्रतीचे कठीण असते. ते कातीव व कापीव कामांस चांगले असून खेळणी, विविध प्रकारच्या वस्तूंसाठी वापरतात. मुळे विरेचक व ज्वरनाशी आहेत. सांध्यात युरिक अॅसिड साठून वेदना होतात तेव्हा बाहेरून मुळांचा किंवा पानांचा रस लावला जातो. पाने पौष्टिक व तापनाशक असून जखमांवर बाहेरून लावण्यास ती उपयुक्त असतात. लहान मुलांच्या अतिसारावर करपलेल्या पानांचा मोहरीबरोबर काढा करून देतात. मुळांचा काढा ओकाऱ्या येण्यास व सारक म्हणून वापरतात. पानांचा काढा दाह कमी करणारा, थंडावा देणारा, भूक वाढविणारा व वेदना कमी करण्यासाठी वापरतात.  शिजविलेली पाने तापात व डोकेदुखीत बाहेरून लेप म्हणून वापरतात. कच्ची फळे भाजून मिठाबरोबर मृदू हिरडय़ांना लावतात तसेच घशाचे विकार, आमांश इत्यादींवरही याची फळे उपयुक्त आहेत. जखमा भरून येण्यासाठी पानांचा लेप करतात. काविळीत मुळांचा काढा देतात. मुळांचा उपयोग वेदनाशामक म्हणून तसेच विंचूदंशावरही करतात. कच्ची हिरवी फळे भाजीसाठी वापरतात.

बारतोंडी फळामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वे असतात. त्याचबरोबर अॅण्टिऑक्सिडंटसुद्धा असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढविण्यास मदत होते. कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो. ज्यामुळे शरीरात कर्करोग पसरत नाही. मधुमेहासाठीही हा उपयोगी आहे. बारतोंडीच्या रसामध्ये पचनशक्ती सुधारण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या पोटातील पचन समस्या दूर होण्यास मदत होते. आतडय़ातील जळजळ व वेदना कमी होतात. सांध्याचा ताठरपणा व वेदना कमी होतात. त्यामुळे या बारतोंडीच्या रसाचे व फळाचे सेवन फायद्याचे आहे.

[email protected]