ठाण्यात वाहतूककोंडी, प्रदूषण वाढले.. चालायला फुटपाथ नाहीत; नियम बदलले आहेत काय? माजी न्यायमूर्तींनी शिंदेसमोरच काढले समस्यांचे वाभाडे

ठाणे शहराला वाहतूककोंडी आणि प्रदूषणाने वेढले आहे. हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले असून सर्वसामान्य नागरिकांना चालायला फुटपाथही नाहीत. 40 ते 50 मजल्यांच्या टोलेजंग इमारती शहरात उभ्या राहात आहेत. पण परवडतील अशा वैद्यकीय सुविधा, शाळा आहेत काय, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज केला. येथील वाहनचालक बेफिकीरपणे उलट दिशेने गाड्या चालवत असून आरटीओच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत काय, असे विचारत ओक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच समस्यांचा पाढा वाचला. एवढेच नव्हे तर ठाण्याची जी दुर्दशा झाली आहे त्याचे अक्षरशः वाभाडे काढले.

‘ठाणे वैभव’ दैनिकाचा सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळा आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आवर्जून आलेले माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ठाणे शहरातील विविध समस्या ओक यांनी मांडल्या. ते म्हणाले, ठाण्यात दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून वाहतूककोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. तलावांचे शहर म्हणून ठाणे ओळखले जाते. पण आता हे तलाव आकसत चालले असून बेसुमार वृक्षतोड, गिळंकृत केलेले फुटपाथ यावरही माजी न्यायमूर्तीनी परखड भाष्य केले.

ठाणे हे मुंबईलगतचे शहर असून दिवसेंदिवस नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. तरी रस्ते मात्र अरुंदच असून अनेक प्रकल्प रखडले आहेत. लोकसंख्या वाढत असल्याने सर्वत्र गर्दीच गर्दी दिसत आहे. ठाणे स्थानकाच्या बाहेर तर लोकांना चालायलादेखील जागा उरली नाही, अशा शब्दांत अभय ओक यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.

वाहतूककोंडीबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्यांवर नियम तोडून उलट दिशेने गाड्या चालवल्या जात आहेत. याचा स्पष्ट उल्लेख करून ते म्हणाले की, ठाणे शहरात नियम बदलले आहेत काय, नवीन संस्कृती निर्माण होत आहे काय, ओक यांनी आपल्या भाषणात मांडलेल्या समस्यांमुळे उपस्थित राजकारणी व सरकारी अधिकारी यांची बोलतीच बंद झाली.

उत्तरे देताना शिंदे यांची दमछाक

ठाण्यातील विविध समस्यांबद्दल माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी चांगलेच सुनावल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भाषण करताना चांगलीच दमछाक झाली. ठाण्यात 25 एकर जागेमध्ये सेंट्रल पार्क उभारले असून 145 उद्याने विकसित केली असल्याचा दावा करण्यात आला. माजी न्यायमूर्तीनी ज्या सूचना केल्या त्याची दखल घेण्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ओक यांनी ठाण्याच्या विकासाबाबत सरकारला धारेवर धरताच शिंदे यांना त्यांच्या भाषणात सारवासारव करावी लागल्याचे दिसून आले.