
बिग बॉसमध्ये सहभागी झालेले आणि स्वत:ची ओळख कवी मनाचा राजकारणी अशी सांगणारे अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं होतं. युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवायचे ठरवल्यानंतर हा मतदारसंघ प्रकाशझोतात आला होता. असे असल्यानेच बिचुकले यांनी इथून निवडणूक लढवायचे ठरवल्याचे बोलले जाते. ते या निवडणुकीत काय कामगिरी करतात याकडे काही जणांचे लक्ष लागले होते.
आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघ पिंजून काढला होता. जाहीर सभा, पदयात्रा, रोडशो यामुळे या मतदारसंघात भगवा झंझावात निर्माण झाला होता. ज्याच्या त्याच्या ओठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या धडाकेबाज प्रचाराचीच चर्चा होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना उमेदवारी दिली होती तर बसपने विश्राम पाडाम यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासोबत बिचुकले यांनी स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली होती.
अभिजीत बिचुकले हे मूळचे साताऱ्याचे असून ते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातत्याने निवडणूक लढवत असतात. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असले तरी उत्साह दांडगा असल्याने त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. यावेळी त्यांनी साताऱ्याऐवजी सर्वाधिक चर्चेत असलेल्या वरळी मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला होता. बिग बॉसमधील प्रसिद्धीचा फायदा आपल्याला मिळेल असा त्यांचा बहुधा अंदाज होता. मात्र मतमोजणीनंतर त्यांचा अंदाज सपशेल चुकल्याचं बघायला मिळतंय.
मतमोजणीमध्ये आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघात पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यांना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 1 लाख 6 हजार 94 मतांपैकी 74,540 मते मिळवली होती. सुरेश माने यांना 16759 मते मिळाली होती. मात्र बिचुकले यांना किती मते मिळतात हे अनेकांना जाणून घ्यायचे होते. बिचुकले यांना फक्त 675 मते मिळाली आहेत.


























































