वन डेतही धडकणार अभिषेकचे वादळ, हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे संघात समावेशाची शक्यता

आशिया कपमध्ये घोंगावणारे अभिषेक शर्मा हे वादळ आता लवकरच ऑस्ट्रेलियात धडकणार आहे. आशिया कपमध्ये गेल्या सामन्यात 248 धावा चोपणाऱ्या अभिषेकची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी राखीव सलामीवीर म्हणून निवड करण्याची तयारी निवड समितीने केली असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माबरोबर शर्माजींचीही आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

आशिया कपच्या पहिल्या सामन्यापासून अभिषेकने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना ज्या पद्धतीने फोडून काढले आहे, ते पाहता वन डे संघातही त्याचे स्थान निश्चित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. त्याने गेल्या पाच सामन्यांत 75, 74, 38, 31, 30 अशा खेळय़ा करून आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. तो टी-20 त सलामीला उतरत असला तरी वन डेत त्याला काही काळ वाट पाहावी लागू शकते. सध्या वन डेत रोहित शर्माच्या साथीला शुभमन गिल येत असल्यामुळे अभिषेकला राखीव सलामीवीर म्हणून निवडले जाऊ शकते. तसेच गौतम गंभीर हे सध्या त्याच्या षटकारबाजीवर भलतेच खूश असल्यामुळे त्याला वन डेतही लवकर खेळताना पाहिले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

आशिया कपमध्ये 120 चेंडूंत 248 धावा

पंजाबमध्ये जन्मलेल्या या 25 वर्षीय खेळाडूने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 61 सामन्यांत 35.33 च्या सरासरीने 2014 धावा फटकावल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 99.21 इतका आहे. शिवाय डावखुरा फिरकी मारा करतना त्याने 38 विकेटही टिपल्या आहेत. आताही त्याने आशिया कपमध्ये सर्वाधिक 17 षटकार आणि 23 चौकार ठोकले असून त्याचा 207 धावांचा अफलातून स्ट्राईक रेट आहे. त्याने 120 चेंडूंत 248 धावा केल्या आहेत.