
सामना प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा प्रयोग हळूहळू जोम धरत असताना आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांनादेखील थंडगार करण्यासाठी एसी लोकल येत आहे. मात्र या नव्या एसी लोकलची उंची थोडी कमी करण्यात आली आहे. या लोकलसाठी वेळापत्रकात जागा तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच ती नेमकी बदलापूर-कल्याण ते सीएसएमटी चालवायची की हार्बर-ट्रान्सहार्बर मार्गावर चालवायची यावर अभ्यास सुरू आहे.
पश्चिम रेल्वेवर भारत हेवी इलेक्ट्रिकल अर्थात ‘भेल’ कंपनीचे इलेक्ट्रिक मोटर आणि पार्टस् असलेली आणि चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात बांधणी झलेली देशातील उपनगरीय मार्गावरील पहिल्या एसी लोकलचे कंत्राट दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या ब्रिटिशकालीन पुलांचा अडथळा रेल्वे अधिकाऱयांच्या लक्षात आला. तरीही त्यानंतर लोकलची उंची कमी करण्याचा शक्य तो प्रयत्न करण्यात आला, परंतु निम्म्याहून अधिक सुटय़ा भागांची ऑर्डर आधीच दिली गेल्याने गोंधळ उडाला.
प्रायोगिक लोकल बांधताना जास्त उंची घटवता आली नसल्यामुळे ही लोकल थोडी उंचच राहिल्याने ती कुर्ल्यापर्यंतच येत होती. पुढे ब्रिटिशकालीन पुलांची रांग असल्याने अडथळे उभे राहिले. त्यामुळे ही लोकल पश्चिम रेल्वेला मिळाली. आता आणखी 12 एसी लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईला मिळणार असून त्या सर्व ‘भेल’ कंपनीच्याच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
summary-ac local for central railway route
























































