एसी लोकलने फोडला प्रवाशांना घाम, ठाणे स्थानकात प्रचंड गोंधळ, चेंगराचेंगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रान्सहार्बर मार्गालवरील ठाणे -वाशी-पनवेल वातानुकूलित लोकल सेवेचा थाटात शुभारंभ झाल्यानंतर गारेगार प्रवासाचा सुखद अनुभव मिळेल या आशेवर ठाणे स्थानकात गर्दी केलेल्या प्रवाशांना प्रचंड गोंधळाला सामोरे जावे लागले. सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी अपेक्षित असलेली एसी लोकल 25 मिनिटे उशिराने आल्याने प्रवाशांची एकच झुंबड उडाली. सवयीप्रमाणे प्रवाशांनी एसी लोकलचे दरवाजे अडवले. स्वयंचलित दरवाजे बंद होत नसल्याने एसी लोकल बराच वेळ फलाटावरच खोळंबली. त्यात एसी लोकलचे तिकीट नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा दुसऱया फलाटावर लोकल पकडण्याची धडपड करत असताना चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना पाचारण करावे लागले.

नवी मुंबईत नोकरी- व्यवसायासाठी रोज लाखो चाकरमानी ठाणे स्थानकातून ट्रान्सहार्बरने प्रवास करतात. त्यांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल झाली असून गुरुवारी त्याचे शानदार लोकार्पण झाले. आज दिवसभर ही लोकल पनवेल ते ठाणे व ठाणे ते पनवेल अशा फेऱ्या घालणार होती. त्यामुळे त्यातून प्रवास करण्यासाठी ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांनी ठाण्यात सकाळीच गर्दी केली होती. सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी ही लोकल अपेक्षित होती. एसी लोकलमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या. एसी लोकल फलाटावर आली तेव्हा लोकलसंदर्भात किंवा त्यांच्या तिकिटाच्या दरांसंदर्भात माहिती देणारे रेल्वेचे कर्मचारी उपस्थित नव्हते. तसेच त्यासंदर्भात उद्घोषणाही होत नव्हत्या. त्यातून पुढे सर्व गोंधळ उडाला.

 बराच वेळ लोकल नसल्याने एसी लोकलवर एकच झुंबड उडाली.
 गर्दी इतकी होती की पुरुषांच्या डब्यात तर अनेकजण नेहमीच्या सवयीप्रमाणे दरवाजात लटकत होते.
 हा गोंधळ सुरू असतानाच दुसऱया फलाटावर लोकल आल्याने ती पकडण्यासाठी धावपळ उडाली.
 गर्दी, गोंधळ आणि धावपळीमुळे स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्याने आरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
 त्यांनाही गर्दी आवरताना नाकीनऊ आले. मात्र सुदैवाने चेंगराचेंगरी टळली.
 स्वयंचलित दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू न होणारे तंत्रज्ञान असल्याने गाडी बराच वेळ एकाच जागी उभी होती.
 गाडीला विशेष तिकीट घ्यावे लागते हे सांगण्यात आल्यानंतर पुन्हा गाडीमधून खाली उतरण्यासाठी गोंधळ सुरू झाला.