गारेगार प्रवास तूर्त कागदावर; सर्व लोकल ट्रेन एसी होण्यासाठी 2032 उजाडणार

उपनगरी रेल्वे मार्गावर सर्व एसी लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लोकल प्रवासात आणखी सहा-सात वर्षे प्रवाशांचा घामटा निघणार आहे.

सध्या मध्य रेल्वेवर 80 तर पश्चिम रेल्वेवर 109 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. जूनमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 238 एसी लोकल चालवण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच लोकल एसी बनवणार असल्याचे जाहीर केले. त्या घोषणेने प्रवाशांच्या आशा पल्लवित केल्या. पण प्रत्यक्षात सर्व एसी लोकल चालवण्यासाठी किमान सहा ते सात वर्षे लागणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पहिल्या टप्प्यातील एसी लोकल ट्रेन दाखल होण्यासाठीच तीन ते चार वर्षे लागतील. त्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. संबंधित गोष्टींचा विचार करता सर्व एसी लोकल चालवण्यासाठी किमान सहा ते सात वर्षे लागणार आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एसी लोकलने वेळेचे गणित बिघडवले!

एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्यापासून साध्या लोकलच्या फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. पीक अवर्सला एसी लोकललादेखील प्रचंड गर्दी होते. त्यामुळे दरवाजे वेळेवर बंद होत नाहीत आणि सर्वच लोकल रखडतात. पश्चिम व मध्य रेल्वेवरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांत गर्दीचा प्रश्न गंभीर बनल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सर्व एसी लोकल चालवणे प्रचंड आव्हानात्मक असेल, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.