एक हजाराची लाच स्विकाराना ग्रामसेवक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धाराशिव

शौचालयाचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल तसेच वडीलांच्या नावे असणारा प्लॉट तक्रारदाराच्या नावे करुन तसा फेर मंजूर करुन ८ अ चा उतारा देण्यासाठी तालुक्यातील भिकार सारोळा येथील ग्रामसेवक अंगद कुंडलीकराव मुंढे यांनी संबंधिताकडून एक हजाराची स्वीकारल्याने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील भिकार सारोळा येथील एकाचे शौचालयाचे अनुदान मिळाले आहे, तसेच त्याच्याच वडीलांच्या नावे असलेला प्लॉट संबंधिताच्या नावे करुन त्याबाबतचा फेर मंजूर करुन ८ अ चा उतारा देण्यासाठी गावचे ग्रामसेवक अगंद कुंडलीकराव मुंढे यांनी एक हजाराची लाच मागितल्याची तक्रार संबंधिताने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

सदरील तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक बी. व्ही. गावडे यांनी शहानिशा करुन आज बुधवार, ५ डिसेंबर रोजी सापळा लावला असता तक्रारदाराचे वरील नमूद काम करण्यासाठी ग्रामसेवक अंगद कुंडलीकराव मुंढे यांने तक्रादाराकडून एक हजाराचा लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी ग्रामसेवक मुंढे याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास विभागाचे पोलीस उपाधिक्षक बी. व्ही. गावडे हे करीत आहेत.