
सामना प्रतिनिधी । हिंगोली
आजेगाव शेतशिवारातील जमीनीचे क्षेत्र वेगवेगळे करण्यासाठी 10 हजाराची लाच स्वीकारतांना सेनगाव येथे खासगी इसम लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात चतुर्भुज झाला आहे.
तक्रारदाराच्या आई व तक्रारदाराचे काका यांच्या नावे सामाईक क्षेत्र असलेल्या आजेगाव शिवारातील जमीनीचे क्षेत्र वेगवेगळ्या करण्यासाठीचे काम तहसीलदार वैशाली पाटील यांच्या ओळखीने कलम 85 अन्वये करून देण्यासाठी खासगी इसम वसंता पुंजाजी मानमोठे हे 30 हजार रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत खात्याच्या कार्यालयात आली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सदर पडताळणी खासगी इसम मानमोठे याने तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडुन त्यांच्या ओळखीने काम करून देण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी करून यातील पहिला हप्ता 10 हजार रूपये स्विकारण्यास सहमती दिली होती. यावरून आज 4 जानेवारी रोजी लाचलुचपत खात्याने सापळा लावला होता. या सापळ्यात आरोपी वसंता मानमोठे याने तक्रारदाराकडुन 10 हजार रूपयाची लाच स्विकारल्यावरून लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. दरम्यान, सेनगावच्या तहसील कार्यालयात दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान झालेल्या या कारवाईची माहिती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल 4.30 तास वेळ लागला. साडेचार तासानंतर एसबीने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात तक्रार नेमकी कधी आली, सापळा कारवाई कोणत्या ठिकाणी आणी किती वाजता झाली, याचा उल्लेख करण्यात आला नाही. तसेच तक्रारीची पडताळणी झाली की नाही, याचाही स्वयंस्पष्ट उल्लेख करण्यात आला नसल्याचे दिसुन आले. तहसीलदाराचे नाव येत असल्यामुळे या कारवाईत काही काळेबेरे करण्यासाठी वेळ दवडण्याचा फंडा वापरला नाही ना अशी चर्चा होतांना दिसून आली.
सेनगावात खळबळ
तहसीलदार वैशाली पाटील यांच्यावर 17 लाखाच्या अफरातफर प्रकरणी कालच धाराशीव जिल्ह्यातील परंडा येथे गुन्हा दाखल झाला असतांना आज सेनगावातच जमिनीचे क्षेत्र वेगवेगळे करण्यासाठी तहसीलदारांच्या नावावर लाच स्विकारणारा इसम पकडल्याने सेनगावात खळबळ उडाली आहे.
































































