
मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात लाच घेताना लिपिकाला रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण गाजत आहे. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनमध्येच मोठी कारवाई केली आहे. १ लाखाची लाच स्वीकारताना कुरार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एका PSI ला ACBने रंगेहाथ पकडले आहे.
मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये ACB ने कारवाई केली. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने (PSI) यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी वकीलाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या टीमने आज दोन्ही पोलिसांना रंगेहाथ अटक केली.
विशेष म्हणजे या पोलिसांच्या कॅबिनमध्ये लाखोंची रोकडही आढळून आली. अटकेवेळी पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये 6 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर केबिनमध्ये झाडाझडती घेतली गेली. यावेळी 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम एसीबीला सापडली आहे.




























































