
सामना प्रतिनिधी । पारनेर
पारनेर तालुक्यातील भाळवणी जवळ कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एस.टी. बस व कार यांच्या भीषण अपघातात नगरमधील दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. दरम्यान, जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
भाळवणी पासून एक किमी अंतरावर कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव फाट्याजवळ माळकुप शिवारात नगरहून कल्याणकडे जात असलेल्या गेवराई-भिवंडी एस.टी. बस व कल्याणहून नगरकडे जात असलेल्या क्रेटा कारचा समोरासमोर अपघात होऊन कारमधील पंकज शहा व त्यांची पत्नी रुपाली शहा यांचा मृत्यू झाला. तर कार चालकास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. अपघात झाल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती समजताच भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पारख व माळकुप परिसरातील तरुणांनी अपघातग्रस्तांना हलविण्यासाठी मदत केली.



























































