नगर-दौंड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-दौंड महामार्गावरील काष्टी येथील शिवनेरी हॉटेलसमोर दोन चारचाकी वाहनांची सामोरासमोर धडक झाली. या अपघातात श्रीगोंदा येथील तरूण बांधकाम व्यावसायिक जय मरकड यांचा मृत्यू झाला असून स्कॉर्पिओतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मांडवगण तांदळीकडील बाह्यवळणाच्या रस्त्याने मरकड यांची गाडी दौंड-नगर महामार्गाच्या दिशेने आली त्याचवेळी नगर-दौंडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने मरकड यांच्या गाडीला समोरून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात मरकड यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. स्कॉर्पिओतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगर-दौंड हा महामार्ग वर्दळीचा आहे. या ठिकाणी हॉटेल, रूग्णालय आणि महाविद्यालय आहेत. तसेच हा वळणाचा मार्ग असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.