
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. रात्री नऊ ते दहाच्या सुमारास औसा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर सोलापूरकडून येणारी भरधाव बीएमडब्ल्यू कार रस्त्याच्या कडेला उभ्या टेम्पो आणि कंटेनरला धडकली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर कारचा पार चेंदामेंदा झाला असून महामार्गावर रक्तमांसाचा सडा पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर औसा शहराजवळील हॉटेल गावरान समोर सोलापूरहून औसाकडे येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच 04 ईजी 7500) लाकडाने भरलेल्या ट्रकला आणि एका कंटेनरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा कारमध्ये 6 जण होते. धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला असून लाकडाने भरलेला ट्रकही पुढे जाऊन उलटला. या अपघातामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
शुभम शेषेराव पाटील (वय -28), किसन रामलिंग साळुंके (वय – 48), आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (वय -36, तिघेही राहणार बोरगाव नकुलेश्वर, ता. औसा) आणि धनराज काशिनाथ जाधव (वय 46, रा. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर जयहिंद विलास जाधव (वय 26 रा. होळकर नगर, औसा) आणि विनायक श्रीकांत होळदार (रा. सांगली) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच औसा पोलीस उपविभागीय अधिकारी कुमार चौधरी, औसाचे पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाले, पोलीस उपनिरीक्षक माळवदकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.































































