
सामना प्रतिनिधी । नगर
नगर-पुणे मार्गावर चास परिसरात बोलेरो आणि लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाटक महामंडळाची बस नगरवरून पुण्याला तर बोलेरो पुण्यावरुन नगरला येत होती. त्याच वेळी हा अपघात झाला. अपघातात दोन दाम्पत्य आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
गंगाधर कुलकर्णी, मंगल कुलकर्णी (केज) दाम्पत्य आणि दीड वर्षाची शर्वरी जखमी आहेत तर लातुरचे सारंग औसेकर आणि मुलगी पृशा जखमी आहे. त्याचबरोबर गिरीश कुलकर्णी आणि शर्वरी कुलकर्णी दाम्पत्य जखमी आहे. जखमींना नगरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
























































