समृद्धी महामार्गावरील अपघातात चालक ठार; 16 जखमी

रायगड जिह्यातील भाविकांच्या टेम्पो ट्रव्हलरचा शनिवारी सकाळी इगतपुरीजवळील समृद्धी महामार्गावरील बोगद्यात भीषण अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील दहिवली येथील 23 जण शनिवारी टेम्पो ट्रव्हलरने शेगाव येथे दर्शनासाठी निघाले होते. कसारा-इगतपुरीदरम्यान समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रव्हलर बाजूच्या भिंतीवर धडकली. यात चालक दत्ता तुकाराम ढाकवळ (27) गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज वानखेडे यांनी तपासून मृत घोषित केले. यात सविता लाड (52), शैला लाड, लीला लाड, मीरा लाड (50), शारदा लाड (60), संगीता लाड (55), गोरख लाड (58), धनश्री नाईक (65), वासंती पिंगळे (63), प्रतिभा लाड (47), विमल लाड (55), हर्षदा लाड (40), सुजाता लाड (42), उमेश लाड (46), यज्ञेश लाड (10), गुलाब लाड (65) जखमी झाले आहेत.