फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट विमानातच अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

विमानातून फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नांदेड पोलिसांनी थेट विमानातूनच अटक केली आहे. शस्त्र वापरुन दहशत पसरविल्याचा आरोप या आरोपीवर असून, पायाला दुखापत झाल्याने तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. पोलीस, रुग्णालयाला पूर्वकल्पना न देताच फरार होण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपीला पोलीस उपनिरीक्षक हराळे यांनी थेट नांदेड विमानतळावर विमानातूनच अटक केली आहे.

शहरातील चिखलवाडी येथील मनिंदरसिंघ गुरुबच्चनसिंघ रामगडीया हे रवींद्रसिंघ लांबा यांच्या विरोधात गुरुव्दारा बोर्डाच्या अधीक्षकांकडे रवींद्रसिंघ लांबा हे मुलींना अश्लिल बोलत असल्याबाबतची तक्रार करण्यासाठी जात असताना रवींद्रसिंघ लांबा यांनी मनिंदरसिंघ रामगडीया यांना म्युझिअमकडे नेवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात रामगडीया जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रामगडीया यांच्या फिर्यादीवरुन रवींद्रसिंघ लांबा यांच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रवींद्रसिंघ लांबा यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान आज सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास रवींद्रसिंघ लांबा यांनी पोलीस, रुग्णालयाला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता फरार होण्याचा प्रयत्न केला. आरोपी रवींद्रसिंघ लांबा फरार होण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक हराळे व अन्य कर्मचाऱ्यांनी विमानतळावर जावून आरोपी रवींद्रसिंघ लांबा यांना थेट विमानातूनच अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी विमान पाच मिनिटे थांबवून ठेवण्यात आले.