
दरोड्याच्या गुन्ह्यात कराड तालुका पोलिसांनी अटक केलेला आरोपी विकास वसंत गुंडनिकम हा पोलिसांच्या ताब्यातून पळाला. विकास याला सातारा येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी कराड येथे आणले होते. यावेळी हा प्रकार घडला. आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली असून याबाबतचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विकास वसंत गुंडनिकम (रा. भाटमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याला 2016 रोजी कराड तालुका पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून तो सातारा जिल्हा कारागृहातच आहे. 21 रोजी त्याला सातारा पोलिस मुख्यालयातील पोलिस पथकाने कराड येथील न्यायालयात नियमीत सुनावणीसाठी आणले होते. न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर पोलीस गाडी साताराकडे निघाली असता, दुसर्या एका संशयिताने लघुशंका आल्याचे पोलिसांना सांगितल्याने, पोलिस पथकाच्या प्रमुखांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गाडी घेण्यास चालकाला सांगितले. त्यानंतर लघुशंका आलेल्या आरोपीला बेडीतून काढताना त्याच बेडीत असलेल्या गुंड निकम याने बेडी काढल्याचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र, तो सापडला नाही. या घटनेची कराड शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्यात आली आहे.



























































