कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या दिशेने येणारी कोणार्क एक्सप्रेस कल्याण स्थानक सोडल्यानंतर गाडीच्या जनरल डब्ब्यात घुसून सशस्त्र दरोडा घालणाऱया चौघांना रेल्वे क्राइम ब्रँचने गजाआड केले आहे. आरोपी कळव्याचे राहणारे असून कटरर्समध्ये मजूरीचे काम करतात. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

5 सप्टेंबरच्या मध्यरात्री कल्याण स्थानकातून कोणार्क  एक्सप्रेस सुटली. गाडी धीमी असतानाच सात ते आठ दरोडेखोर जनरल डब्ब्यात घुसले. त्यांनी चाकू, कोयत्यांचा धाक दाखवत बोगीतील प्रवाशांकडील मोबाईल, पैसे, किंमती ऐवज लुटून घेतले. यावेळी विरोध करणाऱ्या काही प्रवाशांना त्यांनी मारहाण देखील केली. दरम्यान, ठाणे स्थानकाजवळ सिग्नल लागताच दरोडेखोर गाडीतून उडया टाकून पळून गेले होते. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे युनीटचे प्रभारी अधिकारी एपीआय सुरेश चोपडे, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक होळकर, अमंलदार गजानन शेडगे, संतोष भांडवले,अतुल साळवी, संतोष लावंड, स्वप्ना शिंदे, सुदाम भोजणे,अजित माने, सतिष धायगुडे, दिपक कुऱ्हाडे या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सुरुवातीला कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक सात वरील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी कोण हे स्पष्ट झाले. मग सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी खबऱयांना कामाला लावले.

मोबाईल विकायला आले अन् लटकले

आरोपी हे कळवा येथील झोपडपट्टीत राहणारे असून ते कळवा स्थानकाबाहेर चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची खबर होळकर यांना मिळाली. त्यानुसार पूर्वेकडील बाजूस पोलिसांनी सापळा रचून मोबाईल विकायला आलेल्या विकीकुमार गुप्ता (28), मोहम्मद इम्रान मोहम्मद इर्शाद अब्बासी (26), उस्मानअली अब्दुल हुसेन (33) या तिघांना चोरीच्या मोबाईलसह रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांचा चौथा साथीदार सुधा मुलक राऊत उर्फ राजू याला देखील पकडण्यात आले. सर्व आरोपी कॅटरर्समध्ये मजूरीचे काम करतात. झटपट जास्त पैसा कमवूया असे आमिष दाखवत राजूने सर्वांना दरोडा टाकण्यासाठी तयार केले होते. असे तपासात समोर आले आहे.