
सामना प्रतिनिधी । जालना
जुना जालना विभागातील जिनिंग किल्ल्या जवळील तुळजामाता मंदिर जवळ येथे तरुणांचा खंजीराने वार करुन खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तुळजा माता मंदिराजवळ सकाळी १० वाजता एका तरुणाचा कोणी तरी अज्ञात इसमाने खून करुन मृतदेह मंदिराच्या परिसरात टाकून दिला आहे, अशी माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह घटनास्थळास भेट देवून घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण केले. त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, पोलीस उपअधिक्षक अभय देशपांडे, राहुल गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्यातील मयताची ओळख पटवली. मयताचे नाव कुमार शरदचंद्र झुंजुर (२८), रा. लक्ष्मीनारायणपुरा, असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळावरच मार्गदर्शन करुन सुचना दिल्या व स्वतः पथकासह गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, आरोपी विजय मुंगसे रा. मल्लाव गल्ली, मस्तगड जालना याने खून केला आहे. विजय मुंगसे हा जालना सोडून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास मस्तगड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, जयसिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे आदींनी ही कारवाई केली.




























































