हाके हल्लाप्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काल (दि. 27) अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव परिसरात हाके यांच्या गाडीवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ल्यातील तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुह्यानुसार गोरख दळवी, गणेश होळकर आणि संभाजी सप्रे या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींच्या बाजूने ऍड. महेश तवले, संजय वालेकर, अनुराधा येवले, सतीश गिते, सचिन तरटे, योगेश नेमाने व स्वाती जाधव यांनी काम पाहिले. या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, ओबीसी समाजात मोठय़ा प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ विविध ठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत.