आंबेगाव खुर्दमध्ये सराईताचा कोयता डान्स

सराईताने अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण करून त्याच्याकडील दोन हजार रुपये लुटून नेल्याची घटना काल रात्री पावणेदहाच्या सुमारास आंबेगाव खुर्दमध्ये घडली आहे. त्यानंतर त्याने हातातील कोयता नाचवीत परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. प्रवीण आनता येणपुरे (27, रा. वेल्हा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा काल रात्री आंबेगाव खुर्दमधील एका किराणा दुकानासमोर थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सराईत प्रवीण येणपुरे याने या अल्पवयीन मुलाकडे पैसे मागून उलट्या कोयत्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड काढून घेतली. हातातील कोयता नाचवीत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले होते. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी दिली आहे.

वारजेतील रामनगरमध्ये भांडणातून तरुणावर वार
एका महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून टोळक्याने तरुणाच्या घरात जाऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे तरुण जखमी झाला. ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास वारजेतील रामनगरमध्ये घडली. याप्रकरणी राहुल भडके (29) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी राहुल यांच्या घरातील टीव्हीसह इतर वस्तू फोडून नुकसान केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या