
पत्रकारिता, साहित्य, नाट्य व राजकारणाच्या क्षेत्रात लीलया संचार करणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची 13 ऑगस्ट 2025 रोजी 126वी जयंती. अत्रे यांनी ‘केशवकुमार’ या टोपणनावाने लिहिलेल्या व अत्यंत गाजलेल्या ‘झेंडूची फुले’या विडंबनात्मक काव्यसंग्रहाचेदेखील 2025 हे शतकमहोत्सवी प्रकाशन वर्ष. त्याचे औचित्य साधून ‘डिंपल पब्लिकेशन’तर्फे ज्येष्ठ कवी-लेखक डॉ. महेश केळुसकर यांच्या संपादनाखाली ‘झेंडूची फुले’ची नवीन आवृत्ती 13 ऑगस्ट, 2025 रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त त्याच्या प्रस्तावनेतील हा काही अंश.
खरं म्हणजे 1922 च्या मे महिन्यात आचार्य अत्रे यांनी ‘झेंडूची फुले’मधल्या विडंबन कविता लिहिल्या, पण ते हस्तलिखित बराच काळ त्यांच्याकडं तसंच पडून होतं. त्या कविता कोणाला वाचून दाखवण्याचं किंवा प्रसिद्ध करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. अखेर 1925 साली ‘झेंडूची फुले’ प्रसिद्ध झाली आणि ही विडंबने बघता-बघता प्रचंड लोकप्रिय झाली. 2025 हे ‘झेंडूची फुले’चं शतकमहोत्सवी प्रकाशन वर्ष आहे. या वर्षात प्रस्तुत विडंबन कवितासंग्रहाची संपादित नवी आवृत्ती काढण्याची इच्छा ‘डिंपल पब्लिकेशन’च्या अशोक मुळे यांनी आपले मित्र आणि आचार्य अत्रे यांचे नातू (शिरीषताई पै यांचे चिरंजीव) अॅडव्होकेट राजेंद्र पै यांच्या जवळ व्यक्त केली व पै वकील साहेबांनी अगदी आनंदाने लगेचच या प्रस्तावास संमती दिली. त्यानंतर हे संपादनाचे काम मुळे आणि पै यांनी मजवर सोपविले व मी ते यथाशक्ति, यथामति पूर्ण केले आहे.
‘झेंडूची फुले’मधील सर्व कविता मी अथपासून इतिपर्यंत प्रथम लक्षपूर्वक वाचल्या आणि ज्या तत्कालिक संदर्भांनी व्याप्त होत्या, ज्यांमधील राजकीय, सामाजिक व स्थळ-काळाचे संदर्भ आजच्या काळातील वाचकांना आकळणार नाहीत, असे मला वाटले त्या कविता बाजूला काढल्या. तथापि सर्व महत्त्वाच्या विडंबन कवितांचा समावेश प्रस्तुत आवृत्तीमध्ये होईल, यावर कटाक्ष ठेवला. ‘झेंडूची फुले’मधील सुरुवातीच्या कविता वाङ्मयीन आणि विशेषत कविताविश्वातील अपप्रवृत्तींना उघडे पाडण्यासाठी केशवकुमार (अर्थात आचार्य अत्रे) यांनी लिहिल्या आणि उत्तरार्धातील कविता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक नेते व पत्रकार या भूमिकेतून विरोधकांवर आाढमक राजकीय हल्ले करण्यासाठी लिहिल्या, पण शंभर वर्षांनंतरही ज्या आजही ताज्या वाटतील, त्या कविता या आवृत्तीत घेतल्या आहेत. झेंडूच्या फुलांना सुवास नसतो आणि त्यांचा रंगही तसा मोहक नसतो, पण त्या फुलांच्या तळाशी देठापाशी जो पांढरा गर असतो तो खोबऱयासारखा खुसखुशीत गोड असतो. केशवकुमारांची ही काव्येही त्यातील मथितार्थ लक्षात आला की, रसिकांना आजही गोड वाटतील. त्यांनीही रसिकांना ‘केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्या परी खोबरे’ असं आवाहन करून ठेवलं आहे. या नवीन आवृत्तीत सुरुवातीलाच आचार्यांचा ‘मी विडंबनकार कसा झालो?’ हा लेख घेतलेला आहे. त्यामध्ये ‘विडंबन काव्य हा एक वाङ्मयीन टीकेचा अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी प्रकार आहे,’ असं अत्रे साहेबांनी म्हटलं आहे आणि सौंदर्य समीक्षणाचे सूक्ष्म सामर्थ्य त्यांच्या अंगी असल्यामुळेच ही विडंबने यशस्वी झाली आहेत. ध्वनीच्या आणि अर्थाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटा केशवकुमारांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांनी ज्या कवींची विडंबने केली, ते कवी म्हणून दर्जेदार आणि मोठे होते व त्यांची काव्येही प्रसिद्ध होती, त्या काळात गाजत होती. अशा गाजलेल्या काव्यांची सफाईदार विडंबने अत्र्यांनी केल्यामुळेच त्यांना अपरंपार लोकप्रियता लाभली आणि विडंबन काव्यांना ‘एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार’ म्हणून कालांतराने मान्यता मिळाली. आजच्या काळात तर विडंबने, भाष्य कविता आणि हास्य कविता लिहिणारे अनेक कवी मराठीत निर्माण झालेले आहेत व म्हणूनच विद्यापीठीय अभ्यापामात ‘झेंडूची फुले’चा समावेश झाला तर एखाद्या कवितासंग्रहाने शंभर वर्षांनंतरही आपली लोकप्रियता टिकवून ठेवणे या घटनेचे महत्त्व अधोरेखित होईल आणि नवीन पिढीला विडंबन काव्याची परंपरा व स्वरूपही लक्षात येईल.
डॉ. स. गं. मालशे यांनी ऑगस्ट 1972 मध्ये लिहिलेली प्रस्तावना दीर्घ आहे. ती काळजीपूर्वक संपादित करावी लागली. कारण प्रस्तुत आवृत्तीच्या दृष्टीने जो भाग अनावश्यक होता, तो गाळणे अपरिहार्य झाले. मात्र प्रस्तावनेच्या गाभ्याला बाधा पोहोचू नये याची काळजी मी घेतली. मालशे सरांच्या प्रस्तावनेतील सत्त्वांश पुढीलप्रमाणे : ‘तारुण्यात त्यांनी (आचार्य अत्रे यांनी) जी वाङ्मयीन विडंबने लिहिली व पुढे जी राजकीय विडंबने लिहिली, त्यांच्या स्वरूपात फरक असला तरी त्या दोन्ही प्रकारांमागचे व्यक्तित्व एकच आहे, त्यामागची भूमिका एकच आहे. ती म्हणजे अन्यायाची चीड.’ मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘साहित्य’ या त्रैमासिकाच्या ऑक्टो- नोव्हें-डिसें. 97/जा. फे. मा.98 अंकात शिरीष पै यांनी लिहिलेल्या ‘आचार्य अत्रे आणि झेंडूच्या फुलांतली कविमंडळी’ या लेखाचा समावेशही या आवृत्तीत आवर्जून करावा, असं मला वाटलं. याचं कारण म्हणजे ज्या तत्कालीन मोठय़ा कवींच्या काव्यांची विडंबने अत्रे यांनी केली, त्यांच्या काव्यांमधील दोष हसतखेळत दाखविण्याचा अत्रे यांचा उद्देश कसा होता, हे शिरीषताईंनी आपल्या निरहंकारी शैलीत स्पष्ट केलं आहे. ‘झेंडूची फुले’ची पहिली आवृत्ती 1925 साली पुण्याच्या ‘सारस्वत प्रकाशन मंडळ’ या संस्थेने प्रकाशित केली. तेव्हापासून आतापर्यंत दहा आवृत्त्या निघाल्या आणि आता 2025 साली शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही नवीन आवृत्ती ‘डिंपल पब्लिकेशन’तर्फे प्रकाशित होत आहे. नेहमीप्रमाणे ही आवृत्तीही लोकप्रिय होईल, असा विश्वास आहे.