
अॅसिड हल्ला पीडितांची वेदना अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने ‘छपाक’ सिनेमातून मोठय़ा पडद्यावर आणली होती. त्यानंतर आता दीपिका अॅसिड हल्ला झालेल्या एका महिलेच्या उपचारासाठी पुढे सरसावली आहे. बाला असे या महिलेचे नाव असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्या उपचारासाठी दीपिकाने 15 लाख रुपयांची मदत केली आहे.
या महिलेची प्रकृती सध्या गंभीर असून सध्या बालाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. बाला नावाच्या महिलेवर कौटुंबिक वादामधून अॅसिड हल्ला झाला होता. बालावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिने आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात केली होती. सध्या बाला शीरोज कॅफेमध्ये काम करतेय. अॅसिड हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असताना बाला मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंजत आहे. ती डायलिसिसवर जगत आहे. बालाला किडनीवर उपचार करण्यासाठी 16 लाख रुपयांची गरज आहे. शीरोज कंपनीतर्फे ऑनलाइन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा केले जात आहे. दीपिकाने क्षणाचाही विलंब न लावता बालाला 15 लाख रुपये पाठवले.


























































