
वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्यामुळे शाळेच्या टेरेसवर मंडप टापून दहावीची परीक्षा घेणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी देखील या लाजिरवाण्या प्रकारास जबाबदार असताना त्यांना मात्र शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील या पाठीशी घालत असल्यामुळे केंद्र प्रमुखांमध्ये संतापाची लाट आहे.
बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुर्ला येथे यशवंत माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाण उघडे पडले. वर्गखोल्या अपुऱ्या पडल्याने परीक्षार्थींना चक्क टेरेसवर मंडप टापून बसवण्यात आले.
याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी समंदर खान आणि शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे हेदेखील तेवढेच जबाबदार असताना केवळ केंद्र प्रमुखावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी दिले. यापुढे केंद्र प्रमुख म्हणून काम करायचे की नाही याचा विचार करावा लागेल, असेही काही केंद्र प्रमुखांनी बोलून दाखवले.





























































