अनोख्या शुभेच्छांमुळे लाचखोर अधिकाऱ्याचं ‘तोंड’ काळवंडलं; सोशल मीडियावर धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
appasaheb-tondse

सोशल मीडियाच्या मुक्त व्यासपीठामुळे अवलिया लोकांच्या कल्पना शक्तीला भलताच मोठा वाव मिळाला आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर नवनवीन कल्पना पाहायला मिळतात. अशीच एक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.

पंढरपूर पंचक्रोशित आज एका पोष्टने भलताच धुमाकूळ घातला आहे. ती पोष्ट आहे लाचलुचपत खात्याच्या कारवाईशी निगडीत. त्याचं असं झालं, काल गुरुवारी पंढरपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अप्पासाहेब तोंडसे हे 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत पथकाला रंगेहाथ सापडले. जमीन विक्री करण्यासाठी एका शेतकऱ्याने परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यासाठी तोंडसे याने 15 हजार मागितले होते. लाचलुचपत पथकाने योग्य ती कारवाई करून तोंडसे यांना पोलिसांच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.

शेतकऱ्यांकडून लाच घेताना रंगेहाथ सापडल्याने, तोंडसे महाशय आधीच खजील झालेले होते. कसे बसे बिचारे मीडिया पासून तोंड लपवत होते. लाच घेताना सापडल्याने, समाजाला तोंड दाखवायला तोंडसे लाजत असताना, आज एका अज्ञात सोशल मीडिया अवलियाने लाचखोर अधिकारी तोंडसे यांच्या अभिनंदनाची पोष्ट व्हायरल करुन खळबळ उडवून दिली आहे.

या कथित व्हायरल पोष्टमध्ये तोंडसे यांनी लाच घेतली याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून या कारवाईतून त्यांची लवकर सुटका व्हावी व सेवेत पुन्हा दाखल होऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारावी असे साकडे त्या पोष्टकर्त्या अवलियाने श्री विठ्ठल रखुमाईला घातले आहे.

क्षेत्र कुठलेही असो सामान्य माणसाने टेबला खालून पैसे दिल्या शिवाय कामच होत नाही ही प्रवृत्ती बळावत आहे. या लाचखोरीला सर्वसामान्य माणूस पुरता वैतागला आहे.

अशाच एका वैतागलेल्या व्यक्तीने विडंबनात्मक शुभेच्छा देवून आपला राग या पोष्ट च्या माध्यमातून व्यक्त केला आहे. ही पोष्ट सोलापूर जिल्ह्यातील सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

viral post