
मालवण पालिका क्षेत्रात प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, आठवडा बाजाराच्या दिवशी काही व्यापारी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत असल्यामुळे पालिका प्रशासनाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर या मोहिमेत सहभागी झाले होते. कारवाई पथकाने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. तर पाच व्यापाऱ्यांकडून अडीज हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. सोमवार आठवडा बाजारमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिका आरोग्य विभागाच्या खरात, देऊलकर व कोकरे या कर्मचारी पथकाने ही कारवाई केली.
काही ठराविक व्यापाऱ्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या सापडल्या. मात्र, बहुतांश व्यापारी कागदी व पर्यायी स्वरूपातील पिशव्यांचा वापर ग्राहकांसाठी करत होते. बाजारात आलेले अनेक ग्राहकही कापडी पिशव्या घरातून घेऊन येत असल्याचे चित्रही दिसून आल्याने नगराध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. यापुढे कोणीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये. अन्यथा यापेक्षाही कठोर कारवाई केली जाईल, असे सांगत कापडी, कागदी अथवा पर्यावरण पूरक पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
























































