
संपूर्ण आशियातील दुसऱया क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला मोठा झटका बसला आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड, व्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या विदेशी फंड कंपन्यांची खाती गोठवली आहेत. या कंपन्यांकडे अदानी समूहाच्या 4 कंपन्यांचे 43,500 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.
मालकी हक्क आणि लाभार्थ्यांबद्दलची माहिती लपवल्याचा ठपका ठेवत एनएसडीएलने आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याखाली विदेशी फंड कंपन्यांची खाती गोठवली आहेत. सेबीच्या नवीन नियमानुसार तिन्ही विदेशी गुंतवणूकदारांनी केवायसी सादर करणे आवश्यक होते. त्यासाठी या कंपन्यांना 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत केवायसी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे एनएसडीएलने फंड कंपन्यांची खाती गोठवली आहेत. या कारवाईमुळे संबंधित फंड कंपन्यांना तूर्त अदानी समूहाच्या शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड, व्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या विदेशी फंड कंपन्यांची अदानी इंटरप्रायझेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के भागिदारी आहे. दरम्यान, कारवाईचे वृत्त दिशाभूल करणारे व चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण देत अदानी समूहाने वृत्ताचे खंडन केले.























































