पाणीटंचाईचा गैरफायदा घेत अनेकदा टँकरमाफिया अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांकडून अवाचेसवा रुपये उकळतात. मात्र मीरा- भाईंदरमध्ये आता टँकरचे पाणी हवे असेल तर आधी सोसायट्यांना पालिकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर अवघ्या हजार रुपयांत शुद्ध पाणी काही तासातच संबंधित सोसायटीला पुरवठा करण्यात येणार आहे. पालिकेच्या या टँकर धोरणामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय दूषित पाणीपुरवठा करून रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या टँकरमाफियांचेदेखील कंबरडे मोडणार आहे.
मीरा-भाईंदर शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या चार मजल्यावरील नवीन इमारतींना नळ जोडणी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याशिवाय अनेक जुन्या सोसायट्यांनादेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिक टँकरने पाणी मागवतात. परंतु महापालिकेने आता टँकर धोरण निश्चित केले आहे. यानुसार शहरातील जवळपास २०० टँकरचालकांना पाणीपुरवठा करायचा असेल तर आधी पालिकेकडे रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. याबरोबरच सोसायट्यांनाही पाणी हवे असल्यास त्यांना पाणीपुरवठा विभागाकडे नोंदणी करावी लागेल. यासाठी तेथे पैसे भरून पावती देण्यात येईल. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी त्या भागातील संबंधित टँकरचालकांना चलन व सोसायटीचे नाव पाठवतील. त्यानुसार कमी वेळेत आणि कमी पैशात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
महापालिकेचे भाईंदर फाटक येथे जलकुंभ आहे. या ठिकाणाहून टँकरचालकांना पाणी भरून शहरात वितरित करता येणार आहे. तसेच अन्य ठिकाणाहूनदेखील पाणी उचलता येणार आहे. मात्र नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा याकरिता पालिकेने जलकुंभाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याठिकाणी जलमापक यंत्र बसवण्यात येणार असून दिवसभरात किती टँकर भरले याची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. जिथून पाणी उचलण्यात येणार आहे त्या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत.
निकृष्ट कामामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, ट्रॅफिकचा कोंडमारा तसेच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने वाढलेला भ्रष्टाचार यामुळे मीरा- भाईंदर शहराच्या विकासाचा पुरता विचका उडाला आहे. मात्र पालिका आयुक्त संजय काटकर यांच्या टँकर धोरणामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून टँकरमाफियांना चाप बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.