फरारी सराईताविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई, मागील दीड वर्षांपासून होता फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगल अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आणि दीड वर्षांपासून फरार असलेल्या सराईताला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्याविरुद्ध 2012 पासून 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार त्याला एमपीडीए अ‍ॅक्टनुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची करण्यात आली आहे.

अमित दीपक आरडे (27,रा. पदमावती, सहकारनगर ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. याच्याविरुद्ध तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांनी एमपीडीए अ‍ॅक्टनुसार प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्याला नोव्हेंबर 2019 पासून स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून अमित फरार झाला होता.

यासंदर्भात पोलीस नाईक पी. सी. मरगजे यांना तो इंदापूरमधील अंथुर्णे गावात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आहे.