कृत्रिम फुले वापरणाऱ्या डेकोरेटर्स, हॉलमालकांवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, लवकरच जीआर काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिक किंवा थर्माकोल अशा अविघटनशील साहित्यापासून तयार केलेल्या वस्तूंवर राज्यात कायद्याने बंदी आहे, पण अशाच प्रकारची कृत्रिम फुले राज्यात विकली जात आहेत. त्या फुलांचा सजावटीसाठी वापर केल्यास डेकोरेटर शिक्षेला पात्र ठरणार आहे. इतकेच नव्हे तर अशा सजावटीला परवानगी देणाऱया मॅरेज हॉलच्या मालकांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय लवकर जारी केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांमुळे होत असलेल्या दुष्परिणामांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. उदाहरणादाखल कृत्रिम फुलेही त्यांनी सभागृहात आणली. कृत्रिम फुले वापरली की काही दिवसांनी त्यांचा रंग जातो. ते रंग हवेत, पर्यावरणात मिसळतात. त्यात घातक रसायने असल्याने ती मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. कर्परोगासारखे जीवघेणे आजारही त्यामुळे होऊ शकतात असे संशोधनात समोर आले आहे. पाळीव प्राण्यांच्या पोटात ही फुले गेल्यास त्यांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. तसेच विषारी रंग फुग्यांमध्येही वापरले जात असून लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात, असे सांगत कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी जिथे कृत्रिम फुलांची विक्री होते तिथे खरी फुले विकलीच जात नाहीत. त्यामुळे खरी फुले विकणारे शेतकरी संकटात आले आहेत. दादरमधील फूलविव्रेत्यांना  हटविण्यात आल्याकडे लक्ष वेधले.

दादरमध्ये रस्त्यावर फुले विकणाऱयांना पर्यायी जागा देणार   

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान दादरमधील काही विव्रेते विस्थापित झाले असतील, तर त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. सनातन संस्पृतीत फुलांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याने फुलांचे मार्पेट सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे फुलांचा व्यापार आणि बाजारपेठा सुरळीत चालाव्यात यासाठी महानगरपालिकेला आवश्यक ते आदेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.