अभिनेत्रीचा विनयभंग करणार्‍या ‘हिरो’ला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

चित्रपटाच्या शुटींगसाठी महाराष्ट्रभर फिरत असताना अभिनेत्रीचा अभिनेत्याकडून वारंवार विनयभंग होत होता. या अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले. या दोघांना वानवडी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले असताना या ‘हिरो’ने तिथे तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.

सुभाष दत्तात्रय यादव (वय २७, रा. शास्त्री रस्ता) याला अटक केली आहे. २३ वर्षीय अभिनेत्रीने (रा. मुंबई) यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

गेल्या दोन वर्षापासून सुभाष आणि पिडीत अभिनेत्री एका चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी महाराष्ट्रभर फिरून शुटींग करत होते. दोन आठवड्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शीत झाला आहे.  दरम्यान, या चित्रपटाचे महाराष्ट्रात शुटींग सुरू असताना सुभाष यादव हा तिच्याशी जवळीक साधून लगट कण्याचा प्रयत्न करत होता, वारंवार फोन करून तिला त्रास देत असे. काही दिवसांपूर्वी तिने त्याला समजावून सांगण्यासाठी चतु:शृंगी मंदिरात बोलावून घेतले. तिने त्या ठिकाणी सुभाषला नीट वाग असे सांगितले. परंतू, त्याने तेथेही गोंधळ घालत तू लांब गेलीस तर तुला बदनाम करेन अशी धमकी देऊ लागला. हा गोंधळ वाढू नये यासाठी त्यावेळी या अभिनेत्रीच्या चालकाने त्वरीत १०० क्रमांकावर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सुभाष यादवला चौकीमध्ये पकडून नेले. तेथे त्याने या अभिनेत्रीची माफी मागितल्याने हे प्रकरण संपले होते.

१७ ऑगस्ट रोजी चित्रपटाचा प्रिमीयर शोच्या वेळी सुभाष यादव हा चित्रपट गृहाबाहेर नाचत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वायपेयी यांच्या निधनाचा दुखवटा असताना यादव हा नाचत असल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली. हा व्हीडीओ या अभिनेत्रीच्या मोबाईलमधून व्हायरल झाल्याने, त्याने याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात  तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शनिवारी सुभाष यादव आणि अभिनेत्रीला वानवडी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुभाष यादव हा तिला दोन वर्षापासून त्रास देत असल्याचे समोर आले. तेथेही हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ही तरूणी पोलीस ठाण्यातील स्वच्छता गृहात जात असताना सुभाष यादवने तिचा पाठलाग करून तिला आडवून लगट करण्याचा प्रयत्न केला, तसचे तिला धमकावले. थेट पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले. या अभिनेत्रीने विनयभंगाची तक्रार देताच त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक आर. पी बागुल करत आहेत. दरम्यान, रविवारी न्यायालयाने यादवचा जामीन मंजूर केला.